अमरावती - गृह विलगिकरणाचे नियम मोडल्याप्रकरणी दंड देऊन सुद्धा कोरोनाबाधित वारंवार घराबाहेर फिरत असल्याचे अमरावती महानगरपालिकेच्या भरारी पथकाला आढळून आले. त्यानंतर त्या कोरोनाबाधिता रुग्णाविरुद्ध गृह विलगीकरणाचे नियम मोडल्या प्रकरणी थेट महानगरपालिकेने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याची घटना शहरात घडली आहे. गृह विलगीकरणाचे नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
...तर होणार कारवाई
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात राज्यातील काही जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता गृह विलगिकरण बंद देखील करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात देखील गृह विलगिकरणाचे नियम कडक करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने जवळपास गृह विलगीकरणात असलेल्या १० पेक्षा अधिक रुग्णांच्या घराची पाहणी केली. यापैकी काही रुग्ण हे घरी नसल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले. अशातच नियम मोडणाऱ्या एका कोरोनाबाधितावर महानगरपालिकेने दंड देखील दिला, तरी सुद्धा बाधित घराबाहेर फिरत असल्याने महानगरपालिकेने आज (बुधवार) त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. जर अशाच प्रकारे इतरांनी देखील असे गृह विलगिकरणाचे नियम मोडले तर पोलीस कारवाई करणार असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान अमरावती महानगरपालिका क्षेत्रात गृह विलगीकरण असलेल्या अनेक कोरोनाबाधितांनी गृह विलगीकरणाचे नियम मोडले आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड देखील वसूल करण्यात आल्याच महानगरपालिकेचे अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल