अमरावती : किडनी दान देणाऱ्या सासऱ्याचे नाव तुळशीदास दामोदर सगणे तर जावयाचे नाव सोपान हरिश्चंद्र मेंढे असे आहे. अकोला जिल्ह्यातील वडगाव मेंढे येथील 33 वर्षीय तरुण सोपान हरिश्चंद्र मेंढे हा किडनीच्या आजाराने गेल्या एक वर्षापासून त्रस्त होता. त्याच्या कुटुंबीयांनी औरंगाबाद अकोला तसेच अन्य ठिकाणी किडनीच्या आजारावर उपचार केले. किडनी निकामी झाल्याचे कळताच येथील किडनी विकार तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापासून सोपान हा डायलिसिसवर होते.
दीड महिन्यापासून सुरू होती तयारी : जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या सोपानला डायलिसिसवर जास्त वेळ राहणे कठीण होते. अशातच त्याचे सासरे तुळशीदास दामोदर सगणे (वय वर्ष 56) रा. गायवाडी तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती यांनी आपल्या जावयाला किडनी देऊन त्यांचा जीव वाचवण्याचा मनोदय डॉक्टरांकडे व्यक्त केला. किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तथा वैद्यकीय जुळवाजुळव सुरू होती.
सुपर स्पेशलिटीमधील २०वें किडनी प्रत्यारोपण : मंगळवारी हे किडनी प्रत्यारोपण येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पार पडले. सद्यस्थितीमध्ये सासरा आणि जावई यांची प्रकृती उत्तम असल्याचे किडनी विकार तज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. सुपर स्पेशलिटी या शासकीय दवाखान्यातील हे २० वे किडनी प्रत्यारोपण आहे. 25 रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर आम्हाला शासनाकडे परवानगी मागण्याची गरज राहणार नाही. आमच्या रुग्णांना आम्ही स्वतःच किडनी प्रत्यारोपणाची देणार आहोत. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी या अगोदर शहराबाहेरील डॉक्टरांना पाचरण करण्यात येत होते. परंतु यावेळेस पहिल्यांदाच यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट तथा भूलतज्ञ अशी संपूर्ण टीमच अमरावती शहरातली होती, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी यावेळी दिली.
किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया : 2017 पासून येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2020 पर्यंत ८ किडनी प्रत्यारोपण झाले होते. परंतु 2020 मध्ये आलेल्या कोरोना काळापासून किडनी प्रत्यारोपण थांबले होते. 2022 पासून पुन्हा किडनी प्रत्यारोपण सुरू केली आहे. हे विसावे किडनी प्रत्यारोपण होते, अशी माहिती मूत्रविकारतज्ञ डॉ. राहुल पोटोडे यांनी दिली. किडनी निकामी झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल होत आहेत. तेव्हा साधारणपणे आठवड्याला एक किडनी प्रत्यारोपण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टर पोटोडे यांनी दिली. किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अविनाश चौधरी, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहे, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. प्रणित काकडे, डॉ. गुल्हाने, डॉ. मोलके, डॉ. प्रणित घोंडमोडे, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. नंदिनी देशपांडे, डॉ. बागवाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.