अमरावती - दर्यापूर तालुक्यात एकूण 8 कृषी सर्कल आहेत. यापैकी विमा कंपनीने फक्त 6 सर्कलमध्ये शेतकऱ्यांना विमा दिला आहे. मात्र, थिलोरी व दर्यापूर सर्कलमध्ये शेतकऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून विम्याची रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम तत्काळ जमा करावी, यासाठी कृषी विभाग व महसूल विभागाला वारंवार निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दर्यापूर कृषी कार्यालयाला घेराव घातला. जोपर्यंत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत एकही शेतकरी घरी परत जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी घेतली.
विमा कंपन्यांकडून जाणीवपूर्वक निष्काळजीपणा -
दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतातील पिकांचा विमा उतरवतात. त्यासाठी विमा कंपनीच्या घशात हजारो रुपये घालतात. परंतु ज्या वेळेस प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या विमा देण्याची वेळ येते, त्यावेळेस मात्र या विमा कंपन्यांकडून जाणीवपूर्वक हयगय केली जाते. आता पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. विम्याचे पैसे मिळाले तर शेती करू असे, नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. त्यामुळे तत्काळ ही विम्याची रक्कम मिळावी. या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन केले.