अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र, या कामात जिल्ह्यातील नांदगाव खण्डेश्वर तालुक्यातील वाढोणा गावातील शेतकऱ्याला त्याच्या शेतातील विहिरीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने रखरखत्या उन्हात विहिरीत बसून आंदोलन पुकारले आहे.
वाढोणा गावातील सीताराम कंटाळे यांच्याकडील शेतीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी शेतीचा मोबदला देताना शेतातील बांधलेल्या विहिरीचा मोबदला त्यांना दिला नाही. कंटाळे यांच्या ७ बाऱ्यावर विहिरीची नोंद आहे. मात्र, तरीही त्यांना हा मोबदला देण्यात आला नाही.
रस्ता उभारणी करताना रस्त्याच्या कडेला त्यांची विहीर येत आहे. मात्र, काही अधिकारी विहीर असल्याचा पुरावाच नष्ट करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपले प्रकरण तपासण्यात यावे आणि विहिरीचा मोबदला देण्यात यावा, या करिता आता कंटाळे यांनी अर्धवट बुजविलेल्या विहिरीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.