अमरावती - राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोमवारी भाजप कार्यालयात पुस्तक प्रकाशन केले होते. माजी मंत्री देशमुख यांच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आहे. दोघांनाही घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाकाळात पक्ष कार्यकर्त्यानी केलेल्या कामाची दखल घेणाऱ्या ' सेवाभावाची प्रचिती' या पुस्तिकेचे डॉ. सुनील देशमुख यांनी सोमवारी भाजप कार्यालयात प्रकाशन केले होते. बुधवारी त्यांना अस्वस्थ जाणवत असताना त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. कोरोना चाचणीचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा मुलगाही कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
या नेत्यांनाही कोरोनाची झाली होती लागण
यापूर्वी अमरावतीत माजी मंत्री जगदीश गुप्ता, खासदार नवनीत राणा, आमदार नवनीत राणा, दर्यापूरचे आमदार शिक्षक आमदार प्रा. श्रीकांत देशोपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. माजी महापौर विलास इंगोले यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात गुरुवारी 166 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 744 वर पोचला आहे. त्यापैकी 8 हजार 897 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 हजार 594 रुग्णांवर कोरोनावरील उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण 253 जणांचा मृत्यू झाला आहे.