अमरावती - जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई कायम असताना पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठ्यासाठी नाल्यातून गेलेला पाईप फुटल्याने पिण्याचे शुद्ध पाणी सांडपाण्याच्या नाल्यातून वाहून जात आहे. विशेष म्हणजे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष देण्यात येत आहे.
वडाळी तालावालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाने पिण्याची टाकी उभारली आहे. वडाळी आणि कॅम्प परिसरात येथून पाणी सोडले जाते. या टाकीतून जी पाईपलाईन टाकण्यात आली ती वडाळी तलाव येथून सुरू होणाऱ्या नाल्यातून टाकण्यात आली आहे. या नाल्यातच पाण्याचा पाईप फुटला असून याठिकाणावरून पाणी नाल्याने वाहत आहे.
मार्च महिन्यापासून हा पाईप फुटला असून पिण्याचे पाणी नाल्यातून वाहून चालले असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रार देऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, अशी माहितीही येथील रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.