अमरावती - काही वर्षांपूर्वी शेतकरी वडीलांच दुर्दैवी निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी जन्मदात्या आईवर आली. पण शेतकऱ्याची लेक धनश्री ( Farmers Girl Passed PSI Exam ) खचून गेली नाही. तिला तिच्या आई-वडिलांच स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यासाठी तिनं जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. 2019मध्ये तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या (2019 MPSC Exam Result ) माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक ( PSI Exam ) पदाची परीक्षा दिली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या दोनोडा या छोट्याश्या खेडे गावातील विद्यार्थीनी धनश्री भाऊराव सगणे ( Dhanashri Sagane Become PSI ) ही पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पाहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण झाली आहे.
पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील दोनोडा या गावात धनश्री सगणे ही विद्यार्थिनी राहते. 2018 पासून तिने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी या परीक्षेसाठी तिने तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने परीक्षा दिली. पहिल्याच टप्प्यात ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी तिने शारीरिक चाचणी दिली. यामध्ये ती विदर्भातून प्रथम, तर महाराष्ट्रातून द्वितीय आली आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्द हेच यशाचे गमक असल्याचे धनश्री सगणे यांनी सांगितले.
मेहनतीने मिळाले यश - खेडेगावात राहणारी मुलगी ही झेप घेईल, असं वाटत नव्हतं. पण, तिने चिकाटी सोडली नाही. मेहनत घेतली. वडील गेल्याचं दुःख होतं. पण, दुःखी राहण्यापेक्षा तिने मेहनतीवर भर दिला. त्यामुळं ती आता इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. धनश्रीने सरावाला सुरुवात केली, तेव्हा पहिल्या दिवशी लोखंडी गोळा फेकल्या जात नव्हता. आता ती सहा-सात मीटरपर्यंत गोळा फेकते. आईला फोन केला. तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते. धनश्रीचा अभ्यास सुरूच आहे. पुढं तिला डीवायएसपी बनायचं आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी खचून जाऊ नये, असं धनश्रीचं म्हणणं आहे.
हेही वाचा - Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरुन घसरले; एकाचा मृत्यू