अमरावती - कोरोना अनुषंगाने संचारबंदी असतानादेखील शनिवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी दोन अपघात घडले. विविध ठिकाणी घडलेल्या या अपघातात दोघांचा मृत्यु झाला आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वलगाव मार्गावर काळ्या पिवळ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. तर वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी-चांदुर बाजार मार्गावर एका चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.
काळ्या पिवळ्या गाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भरधाव काळ्या पिवळ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. अक्षय सुभाष उमाळे (27, रा. डोंगरगाव, ता. दर्यापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही घटना वलगाव मार्गावरील नवसारी नजीकच्या अमन पॅलेससमोर शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 9.45 वाजताच्या सुमारास घडली. या अपघाताप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी एमएच 29-3927 या काळ्या पिवळ्या गाडीचा चालक परवेज खान फिरोज खान (रा. खोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अक्षय उमाळे हा अमरावतीवरून वलगाव मार्गे दर्यापूरला जात होता. यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या परवेजच्या वाहनाच्या धडकेत अक्षयचा मृत्यु झाला. या घटनेचा पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राजेंद्र लेवटकर करीत आहेत
आणखी एका अपघातात दुचाकीस्वार ठार
आणखी एका भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना चांदुर बाजार ते बोराळा महामार्गावरील पिंपरी फाट्याजवळ शनिवारी (10 एप्रिल) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात राजेंद्र अर्जुन कोठे (रा. नवजीवनकॉलनी) याचा जागीच मृत्यु झाला. राजेंद्र कोठे हा एमएच 27 सीजे 4407 या दुचाकीने जात होता. यादरम्यान चांदुर बाजार ते बोराळा मार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर चालक हा वाहन घेऊन पसार झाला. या घटनेच्या माहितीवरून वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात चारचाकी वाहनाच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वलगाव पोलीस ठाण्यातील एएसआय चंदन मोरे यांनी दिली.