अमरावती : येथे मंगळवारी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजारावर पोहोचला. 3 एप्रिलला अमरावतीत कोरोनाचा पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. तर, 93 दिवसातच अमरावतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे.
मंगळवारी अमरावतीत 21 कोरोना रुग्ण आढळून आलेत. यापैकी कंवरनगर परिसरातील 64 वर्षीय पुरुष आज दगावला असून तो कोरोनाने दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, कैलासनगर, सावरडी, बरतन बाजार, रामनगर, शिंगणापूर, तिवसा, नवी वस्ती बडनेरा, हरिदास पेठ, राहुल नगर, फर्शी स्टॉप परिसर, चौधरी चौक येथील झेनिथ रुग्णालय, पंचशील नगर, चपराशीपुरा, गीताई नर्सिंग होम, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पूर्णा नगर येथे कोरोना रुग्ण आढळून आलेत.
अमरावती शहरात आजवर 14 हजार 775 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यापैकी 476 जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत. सद्यस्थितीत 317 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, 27 रुग्णांना उपचारासाठी नागपुरला हलविण्यात आले आहे. कोरोनामुळे अमरावतीत 35 जण दगावले आहेत. संपूर्ण अमरावती शहर कोरोनाने व्यापले असून जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.