अमरावती - मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात मोची जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविणाऱ्या नवनीत राणा यांनी भारतीय संविधानाची पायमल्ली केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने मागणी केली आहे.
आमदार राणांनी केला पदाचा दुरुपयोग
मोची जातीचे बनावट जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे बनावट कागदपत्र सादर करून निवडणूक लढविल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. बडनराचे आमदार रवी राणा यांनी त्यांच्या पत्नीला जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला. त्यामुळे तेही नवनीत राणा इतकेच दोषी असल्याचे महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांचे म्हणणे आहे.
मागासवर्गीयांना न्याय मिळावा
भारतीय संसदेला आम्ही पवित्र मानतो. लोकशाहीच्या मंदिरात असलेल्या संविधानाच्या मूळ तत्वांना तिलांजली देऊन बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे मागासवर्गीयाचा हक्क डावलणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करून मागसवर्गीयना न्याय मिळवून देण्याची मागणीही अरुण गाडे यांनी केली. नवनीत राणा यांच्यावर कारवाई झाली नाही. महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघ राज्यभर आंदोलन छेडणार, असा इशाराही अरुण गाडे यांनी दिला.
हेही वाचा - वरूडमध्ये वंचितचे घेराव आंदोलन; आंदोलकांना पोलिसांकडून अटक