अमरावती - जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यामध्ये त्याने मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची नगरपंचायतीच्या बाहेर झाडाला लटकवून प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
तिवसामधील बाजार ओळ व जुन्या नगरपंचायत कार्यालय परिसरात फुटपाथवर अवैधरीतीने व्यवसाय करू देण्याची व्यावसायिकांची मागणी होती. मात्र, संबंधित रस्ता हा रहदारीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या पादचारी लोकांना व वाहन चालकांना त्रास होत असल्याने नगरपंचायतचा विरोध होता. मात्र, भाजप शहराध्यक्ष अमित बाभूळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली. सर्वजण मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्या कक्षात शिरले. मात्र, मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची कार्यालया बाहेर काढून ती नगरपंचायतच्या बाहेर असलेल्या झाडाला लटकून प्रशासनाचा निषेध केला.