अमरावती - केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली काद्यांवरील निर्यातबंदी कालपासून पुन्हा लागू केली आहे. लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी निर्यतीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. कांदा निर्यातबंदीचे काही कारण नव्हते कारण कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून काढला आहे. मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवण्याचे काम केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या सभेत म्हणाले होते, 'मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही' निर्यात बंदी ही बेईमानी नाही तर काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारण नसताना निर्यातबंदी करून कांद्याचे भाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. जर कांदा खरेदी करणाऱ्यांचा विचार होत असेल, तर दिल्लीच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात जाऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णायामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा कवडीमोल दरात विकला होता. आता कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारने निर्यातबंदी केली.