अमरावती - नागपूर ते मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग १ मे २०२१पासून नागपूर ते शिर्डीपर्यंत सुरू होतोय. याकरिता अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण होत आहेत. या महामार्गात अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह शाळेचा काही भाग आणि विहीर गेलेली आहे. विहिर तोडण्याची परवानगी नसतानादेखील समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांनी बळजबरीने रात्रीच्या वेळी विहीर बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. दरम्यान, या समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या लोकांनी या पाण्याच्या विहिरीत डिझेल टाकल्याचा गंभीर आरोप, संस्थाचालक मतीन भोसले यांनी केला आहे.
जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण सुरू
समृद्धी महामार्गाच्या बांधकामात मंगरुळ चव्हाळा येथील आदिवासी आश्रम शाळेचा काही भाग गेला आहे. या महामार्गात आलेल्या विहिरीमधून आदिवासी शाळेच्या मुलाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असताना त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध न करून देता पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. विशेषतः विहिरीसंदर्भात जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण सुरू असताना महामार्गाच्या कंत्राटदारांनी चक्क विहिरीत मुरूम टाकून आणि पाण्यामध्ये डिझेल टाकून विहीर बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा फासे पारधी मुलांची असल्याने पारधी समाजावर कंत्राटदार अन्याय करत असल्याचा आरोप प्रश्नचिन्ह शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांनी केला. आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती भोसले यांनी प्रशासनाला केली आहे.
'आम्हाला उड्या घेऊ द्या, नंतर विहीर बुजवा'
आश्रम शाळेची ही विहीर बुजवण्यासाठी कामगार हे रात्री अंधारात जेसीबी मशीन घेऊन आले होते. दरम्यान, या मशीनचा आवाज येताच शाळेतील काही जण विहिरीवर धावून गेले आणि विहीर बुजवण्यास नकार दिला. आधी आम्हाला विहिरीत उड्या घेऊ द्या, नंतर विहीर बुजवा, असा पवित्रा या महिलांनी घेतल्याने अखेर विहीर बुजवण्याचा प्रयत्न कंत्राटदाराचा फसला.
एनसीसी कंपनीची हुकूमशाही
समृद्धी महामार्गवर असलेल्या या विहिरीचा वाद सध्या न्यायालयात आहे. तरीसुद्धा एनसीसी कंपनीच्यावतीने दडपशाही सुरू असल्याचा आरोप मतीन भोसले यांनी केला आहे.