अमरावती Amravati Special Story : हवी तशी वीज नाही, खाण्यासाठी पोषक अन्न नाही आजारी पडलं तर उपचारासाठी जवळपास दवाखाना देखील नाही. अशा परिस्थितीत सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटातील अति दुर्गम भागात वसलेल्या 14 गावातील आदिवासी बांधवांना निदान पिण्यासाठी पाणी मिळावं याकरता शासनाच्या वतीनं मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात आमापाटी हे धरण बांधण्यात आलं. मात्र आता पाणी मिळेल या आनंदात जंगलातील दुर्गम भागात असणाऱ्या 14 गावातील रहिवाशांचा अगदी हिरमोड झालाय. मोठ्या थाटात धरण तयार झालं. या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा देखील झाला. मात्र, ज्या 14 गावांसाठी हे धरण बांधण्यात आलं, त्या गावांना तीन वर्षांपासून पाणीपुरवठ्याची सुविधाच करण्यात आली नाही. त्यामुळं धरण तुडुंब भरलं असतानाही 14 गावं दुर्दैवानं तहानलेलीच आहेत.
असा आहे 39 कोटींचा प्रकल्प : मेळघाटात मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असणाऱ्या अतिउंच भागात घनदाट जंगलात वसलेल्या 14 गावांना पिण्यासाठी पाणी मिळावं याकरता चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या गांगरखेडा गावालगत चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या जंगल परिसरात जलसंपदा विभागाद्वारे आमापाटी हे धरण एकूण 3904.11 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलं. 2006 पासून सुरू असणारं या धरणाचं काम मधेच अनेक कारणांनी खंडित होत होतं. अखेर 2021 मध्ये हे धरण पूर्णत्वास आलं. धरणातील पाणी धरणातून बाहेर काढण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
'या' गावांसाठी बांधलं धरण : मेळघाटात अतिशय मुसळधार पाऊस पडतो. मात्र सातपुडा पर्वत रांगेतून हे संपूर्ण पाणी अतिशय वेगात सखल भागात वाहून जातं. यामुळं संपूर्ण मेळघाटात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. काही भागात उन्हाळ्यात एक थेंब देखील पाणी मिळत नाही तर अनेक गावात बाराही महिने पाण्यासाठी वणवण करावी लागते. आमापाटी धरणाच्या माध्यमातून चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चूरणी, खडीमल, माडीझडप,चुनखडी नावळगाव, पाचडोंगरी, कोयलारी रजनी कुंड तोरणवाडी, कान्हेरी, मोहिआम ,कारडा, कालापांढरी या अतिशय दुर्गम भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी आमपाटी हे धरण बांधण्यात आलंय.
रखडलेल्या कामाला यशोमती ठाकूर यांनी दिली होती गती : मेळघाटातील या चौदाही गावांमध्ये पाणीपुरवठा व्हावा या उद्देशानं 2007-8 मध्ये शासनानं आमच्या गांगरखेड गावालगत आमापाटी हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. या धरणाचं काम त्यावेळी सुरू झाल्यावर शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न, मोबदला अशा अनेक कारणांमुळं अडखळत हे काम जीवन प्राधिकरणच्या वतीनं कसंबसं सुरू होतं. यशोमती ठाकूर ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यावर त्यांनी खऱ्या अर्थानं या धरणाचं काम झपाट्यानं व्हावं यासाठी पुढाकार घेतला आणि 2020-21 मध्ये या धरणाचं काम पूर्ण झालं, असं मेळघाटातील गांगरखेड या गावातील भाजपाचे पदाधिकारी आणि माजी उपसरपंच रामोद मोरले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. तसंच आता या धरणातील पाणी आमच्या गावासह सर्व चौदाही गावांना लवकरच मिळावं अशी अपेक्षा देखील रामोद मोरले यांनी यावेळी व्यक्त केली.
सरकारला मेळघाटचं काय घेणं देणं? : महाविकास आघाडीचं सरकार असताना कोविडचं संकट कोसळलं होतं. असं असताना देखील महाविकास आघाडी सरकारनं विकास कामांना अडथळे जाणार नाही आणि कामात सातत्य कसं राहील याचा नक्कीच प्रयत्न केला. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार गेलं तेव्हा नव्या सरकारनं सुरू असलेल्या सर्व विकास कामांवर स्थगिती आणली. त्यामुळं मेळघाटातील 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला, असं अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या. तसंच मेळघाटचे आमदार सत्तेसोबत आहेत त्यांनी खरंतर या धरणातून 14 गावांना पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. जिल्ह्याचे आधीचे पालकमंत्री जिल्ह्यात कधी दिसले नाही आता नवीन पालकमंत्री आलेत. या सरकारला जिल्ह्याचं आणि मेळघाटाचं काहीच घेणं देणं नाही अशी खंत देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलून दाखवली.
हेही वाचा -
- Ashtmasiddhi pilgrimage : मुलांच्या आरोग्याकरिता 'या' ठिकाणी वाहिले जातात विविध भोपळे, जाणून घ्या अनोखी प्रथा
- marigold farming story : सोनेरी झेंडूची शेती ठरतेय लाख मोलाची; वाचा गंगापूरातील शेतकऱ्याची कहाणी
- Folding Electric Cycle : पुण्यातील प्राध्यापकानं बनवली संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल!