अमरावती - जिल्ह्यातील भीषण परिस्थिती पाहता, अमरावतीला दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करण्यात यावा. या मागणीसाठी अमरावती काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसहीत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.
सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात अपयशी - काँग्रेस
राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री केवळ बाताच मारत आहेत. यावर्षी पाऊस झाला नसल्याने आजही अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबतीत सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. वास्तवात आज शेतकऱ्यांच्या मालालाही हमी भाव मिळत नाही. शेतकरी संकटात असताना केवळ खोटे आश्वासन दिले जात आहेत, असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची वास्तविकता सरकारकडे कळविण्यात येईल, असे आश्वासन मोर्चेकरांना दिले. शेतकऱ्यांचे दुःख, वास्तविक परिस्थिती पाहता अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी आज अमरावती काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात अमरावती काँग्रेसच्या प्रदेशकार्याध्यक्षा आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते सामिल झाले होते.