अमरावती- कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी लॉकडाऊनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा सीमेवरून प्रवेश करणा-या वाहनांना प्रतिबंध करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना, तर अमरावती शहरामध्ये प्रवेश करणा-या प्रतिबंध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
किराणा, दूध, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 ही वेळ यापूर्वीच निश्चित करून देण्यात आली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सदर वेळेत सुरु राहतील. सर्व प्रकारची औषधी दुकाने व रूग्णालये सुरु राहतील. आदेशानुसार, मागील पारित केलेल्या संचारबंदीच्या आदेशातील मुद्दे व सूचना तशाच कायम ठेवण्यात आल्या आहेत. अमरावती शहर व अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, साप्ताहिक बाजार, जनावरांचे बाजार, उत्सव, जत्रा आदी बंद ठेवण्यात येतील.
अमरावती शहर व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँका, खासगी बँक, सहकारी संस्था, पतपेढी संस्था व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तीय संस्था यांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 अशी राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडील सायन्सस्कोर मैदान, दसरा मैदान, भाजीबाजार येथील भाजीपाला व फळ यार्ड 17 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नवीन मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन यांनी या लॉकडाऊनमध्ये पालन करावयाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या ठिकाणी क्लस्टर व कंटेनमेंट झोन निर्माण झाले आहेत, तेथे नवीन मार्गदर्शक सूचना लागू राहणार नाहीत. लॉकडाऊनच्या कालावधीत एखादे नवीन क्षेत्र क्लस्टर व कंटनेमेंट झोन घोषित झाल्यास तेथेही नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व सवलती रद्द होणार आहेत.
महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या क्षेत्रात, मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात व मुख्याधिका-यांनी नगरपरिषद, पंचायतीच्या क्षेत्रात क्लस्टर व कंटेनमेंट झोनमध्ये निवासी नागरिकांना आरोग्य सेतू ॲपद्वारे 100 टक्के संरक्षण प्राप्त होईल, यासाठी प्रयत्न करावे असे आदेश देण्यात आले आहेत.
65 वर्षांवरील ज्येष्ठ, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील बालके यांनी आवश्यक व आरोग्यविषयक कारणांशिवाय बाहेर पडू नये. लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारची कटिंग, सलून, स्पा आदी दुकाने बंद राहतील. परवानगी दिलेल्या व्यक्ती व वाहनांना या काळात वाहतूक करता येईल.
शासकीय, खासगी, सार्वजनिक क्षेत्र कार्यालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना आरोग्य सेतू हे ॲप वापरणे बंधनकारक करावे. याबाबतची जबाबदारी कार्यालयप्रमुखाची असेल. शासकीय, खासगी, सार्वजनिक क्षेत्र कार्यालयात आठवड्यातून एकदा संपूर्ण निर्जंतुकीकरण करावे, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.