अमरावती - देशात आणि राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. ही सर्व पळापळ लाचारी किंवा आपले काळे कृत्य झाकण्यासाठी होत आहे. असे असले तरी अमरावती विधानसभा मतदारसंघात मात्र स्वतःच्या स्वाभिमानासाठी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपची दीक्षा घेतली होती.
डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विदर्भातील मोठा चेहरा पहिल्यांदा भाजपवासी झाला. काँग्रेसचा गड असणाऱ्या अमरावती विधानसभा मतदारसंघवर 1990 आणि 1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला होता. अमरावती महापालिकेतही भाजपचे वर्चस्व होते. भाजपच्या या तगड्या आव्हानाला 1999 च्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांनी छेद देत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा नव्याने फडकविला. आज मात्र डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपमय झाला आहे.
हेही वाचा-ठाणे विधानसभा आढावा : ठाणे शहराचा बालेकिल्ला कोण सर करणार? भाजप सेनेत चढाओढ
2019 च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी डॉ. सुनील देशमुख यांचे कट्टर विरोधक रावसाहेब शेखावत यांनी जणू नांगी टाकल्याचे वातावरण आहे. असे असताना काँग्रेसच्या हक्काची अमरावती विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी फिल्डिंग लावली आहे. यामुळेच बडनेरा मतदारसंघात तीन वेळा निवडणूक लढविणाऱ्या सुलभा खोडके यांची अमरावती विधानसभा मतदारसंघात एन्ट्री झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
हेही वाचा-गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?
अद्याप अमरावती मतदारसंघात निवडणुकीसंदर्भातील वातावरण शांत असले तरी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पक्षांतर्गत खदखद तसेच डॉ. सुनील देशमुख यांच्या ऐवजी आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या अकरा कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रकट केलेली इच्छा, हे सर्व पाहता अमरावती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नक्कीच रंगतदार वळण घेईल असे चित्र आहे. सध्या मतदारसंघात सुरू असणाऱ्या रंगतदार घडामोडी पाहता आमदार डॉ. सुनील देशमुख यांना नेमके कोण आव्हान देणार याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे.
हेही वाचा-शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?
अमरावती विधानसभा मतदार संघ 2014 चा निकाल
डॉक्टर सुनील देशमुख भाजप - 84 हजार 33
रावसाहेब शेखावत काँग्रेस - 48 हजार 961
अख्तर मिर्झा नवीन बॅग बसपा - 11 हजार 585
प्रदीप बाजड शिवसेना -8 256
गणेश खारकर - 1 हजार 30
मतदार संख्या
पुरुष - 1 लाख 74 हजार 57
महिला - 1 लाख 64 हजार 671
तृतीयपंथी - 13
एकुण मतदार- 3 लाख 23 हजार 242