अमरावती - प्रत्येक भारतीय सण निसर्गाशी नाते जोडणारे आणि त्यांच्या संवर्धनाचा संदेश देताना दिसून येतात. त्यापैकीच रक्षाबंधन हा एक पारंपरिक सण रक्षणाचे महत्व अधोरेखीत करणारा सण म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर रक्षा बंधनाचे औचित्य साधून अमरावतीचे कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी निसर्गाच्या रक्षणाचा संदेश देणारे वृक्षाबंधनाचे एक चित्ररेखाटले आहे.
आज विविध प्रकल्पामुळे शहरातील अनेक झाडे कापली जातात. निर्दयपणे त्यांची कत्तल होते. मात्र वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात, या कोरोनाच्या काळात प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्व पटले आहे. मात्र वृक्षसवंर्धनाचे महत्व अद्याप पटलेले नाही. या झाडांच्या आधारे आपण जगतो, हेच आपण आज विसरत आहोत. मात्र रक्षाबंधनाच्या निमित्ताने या झाडांना भाऊ मानून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आज प्रत्येकांनी घ्यावी व यासाठी सर्वांनी पुढे असे आवाहन करण्यासाठी रक्षाबंधनच्या निमित्ताने से.फ.ला.हायस्कूल धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीचे कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी वृक्षाबंधन या संकल्पनेतून एक सूचक आणि सुरेख चित्र साकारले आहे.
शिक्षक चित्रकार जिरापुरे यांनी आपल्या महाविद्यालयाच्या दर्शनी फलकावर अनोख्या पद्धतीने "वृक्षबंधन" या विषयावर चित्र रेखाटून समाजात जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. अजय जिरापुरे हे मागील अनेक वर्षापासून खडूने फलकांवर चित्र रेखाटनाचे काम करत आहेत. प्रत्येक थोर पुरुषांची जयंती असो पुण्यतिथी ते आपल्या रेखाटनाच्या माध्यमातून संबंधित महापुरषाचे चित्र रेखाटून साजरी करत असतात. यंदा त्यांनी रक्षाबंधनाला वृक्ष जगवण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी हे रेखाटन काढले आहे. तब्बल सात तास व विविध रंगांच्या खडूच्या माध्यमातून त्यांनी निसर्गाला जोपासत रक्षाबंधन साजरा करण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाची जिल्हाभरातून चर्चा होत आहे.