अमरावती : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नाराज आहे. त्याबाबत सर्व काही सकारात्मक होईल, असे मुख्यमंत्र्यांनी फोन करुन सांगितले. 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच पुढचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीला विरोध करणारे काय करणार : शिवसेनेच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सरकार स्थापन केले. तेव्हा राष्ट्रवादीमुळे आम्हाला महत्त्व नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते करत होते. आता या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. मी अजित पवारांचे स्वागत करतो, पण राष्ट्रवादीला विरोध करणारे शिवसेना नेते आता काय करणार, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
सामान्य माणसांचा लाभ व्हावा : विरोधक एकत्र आल्याने सध्याची राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. सर्व घडामोडी घडत असल्या तरी सर्वसामान्यांचे भले व्हावे हा एकच उद्देश आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत कणखर असून सर्वसामान्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतात, असेही बच्चू कडू म्हणाले.
दिल्लीत निघेल तोडगा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न दिल्लीत सोडवला जाईल. सध्या सर्व नेते दिल्लीत आहेत. सत्तेत असलेले सर्वजण सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा असल्याचीही प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी दिला होता मंत्रिपदाचा शब्द : 2019 मध्ये शिवसेनेला सहकार्य केले, तर मंत्रिपद देऊ असा शब्द मला उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला. दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे मी शब्द टाकला मात्र, त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केले. ठाकरेंनी मला दिव्यांग मंत्रालय दिले असते, तर गुवाहाटीला जाण्याची गरज भासली नसती असे कडू म्हणाले.
हेही वाचा - Upcoming Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकणार - चंद्रशेखर बावनकुळे