अमरावती - सकाळी रोज पटकन उठायचे. आंघोळ करून शाळेसाठी तयारी करायची. देवाची प्रार्थना म्हणायची आणि राष्ट्रगीतही गायचे. यानंतर व्हॉट्सअप वर शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करायची. दोन तास आपला अभ्यास आपणच करायचा आणि आपली शाळा ही आपल्या घरातच छानशा एका कोपऱ्यात भरवायची आहे. या चिमुकल्यांना अभ्यासात नेमकी कशी मदत करायची, याचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षणकडून दिले जाणार आहे. एकूणच चिमुकल्या जीवांना कोरोनापासून वाचविण्यासाठीचा हा सारा खटाटोप सर्वांनी मिळून सकारात्मक विचाराने करायचा आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करून शाळेचा अभ्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाद्धतीने शिकविण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करीत आहे. आता एक दोन दिवसात ऑनलाईन शिक्षण प्रणालीबाबत ठोस असा निर्णय होऊन तशा गाईडलाईन्स शाळांना प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्नेहल विरुळकर यांनी ही प्रणाली नेमकी कशी असणार आणि आमच्या शाळेने काय तयारी केली आहे, याबाबतची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
लहान मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे, असे आजपर्यंत आम्ही सांगत आलो आहे. असे असताना आता ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोनचा वापर करणे अनिवार्य असेल. मात्र विद्यार्थ्यांना दिवसभरच्या अभ्यासबाबतच्या सूचना केवळ व्हॉट्सअपवर दिल्या जाणार आहे. त्या सूचना वाचून विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास हा पुस्तकातूनच करावा लागणार आहे. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक 26 जून पासून शाळेत येणार आहेत. सर्व शिक्षकांना शाळेत येऊन अभ्यासक्रमाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानुसार प्रत्येक विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना आज कोणता अभ्यास सांगायचा हे ठरवून तशा सूचना पालकांच्या व्हॉट्सअपवर देण्यात येतील.
शिक्षकांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना तो अभ्यास घरात त्यांनी निवडलेल्या शाळेच्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी स्वतःच्या मनाने चांगला अभ्यास करू शकतात. त्यांना काही अडचण आली तर ते व्हॉट्सअपवर आपल्या अडचणी शिक्षकांना सांगू शकतात आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत कोणत्याही अडचणी सोडविण्यास मदत करतील.
शाळेच्या वेळेनंतर दिवसभर पालकही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात नक्कीच मदत करतील. विद्यार्थ्यांना नेमके कसे मार्गदर्शन करावे, यासाठी शाळेतील शिक्षक वेळोवेळी पालकांना बोलावून त्यांना योग्य असे प्रशिक्षण देतील, मार्गदर्शन करतील, असे स्नेहल विरुळकर म्हणाल्या.
आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड फोन नाही. त्या 30 ते 35 टक्के पालकांना दर आठवड्यात कोणता अभ्यास करून घ्यायचा, याबाबत छापील स्वरूपात माहिती देणार आहोत. एकूणच परिस्थिती बिकट असली तरी सकारात्मक मार्ग काढून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळविण्यासाठी सर्व प्रयत्न आणि योग्य असे प्रयोग करण्याची आमच्या शाळेच्या शिक्षकांची तयारी आहे. शासनाकडून येणाऱ्या सूचना, मार्गदर्शन यांचेही पालन केले जाणार असल्याचे स्नेहल विरुळकर यांनी स्पष्ट केले.