अमरावती- धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा गावानजीक नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती सुपर एक्स्प्रेस महामार्गाच्या निर्माणधीन पुलावरून पुलाच्या लोखंडी गजाचे काम करताना अचानकपणे मचाण पडल्याने ३ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील निंभोरा बोडखा गावानजीक नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती सुपर एक्स्प्रेस महामार्गाच्या निर्माणधीन पुलावर मजनू मिया (२५), ओखील वरमन (३४) व विधान वरमन (१८) रा.कलकत्ता (पश्चिम बंगाल) यांच्यासह आदी कामगार लोखंडी गज बांधणीचे काम करीत होते. परंतु, अचानकपणे मचाण पडल्याने हे तिघेजण खाली पडले. यामध्ये या ३ कामगारांना लोखंडी गजाचा जबर मार लागला. या जखमींना प्रथम ह्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारार्थ यवतमाळ येथील रुग्णालयात हलविणात आले आहे.