अमरावती- युवतींमध्ये स्वरक्षनाची जाणीव निर्माण होऊन त्यांचे बळकटीकरण व्हावे या उद्देशाने जिल्ह्यातील ८० हजार युवती स्वयंसिद्ध होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर युवतींना कराटे, लाठीकाठी आणि मार्शल आर्टचे धडे दिले जाणार असल्याची माहिती, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी दिली.
काही दिवसांपूर्वी शहरात अर्पिता ठाकरे या युवतीची भर रस्त्यात हत्या झाली होती. या घटनेनंतर युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पर्श्वभूमीवर शुक्रवारी ना.डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक एस. बालाजी प्रामुख्याने उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत पालकमंत्री म्हणाले, २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शाळेच्या २ मुली, १ क्रीडा शिक्षक मिळून २२५० मुलींना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण देण्यासाठी ३१ मास्टर्स ट्रेनर नियुक्त करण्यात आले आहे. शाळास्तरावर ८ ते १३ ऑगस्ट पर्यन्त कराटे, लाठीकाठी, एरोबिक्स आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येईल. १५ ऑगस्टला विभागीय क्रिडा संकुल येथे ५ हजार मुलींचे एकत्रित प्रात्यक्षिक सादर होईल. तसेच प्रत्येक तालुकास्तरावर २ हजार मुली या उपक्रमात सहभागी होतील. मुलींच्या मनगटात ताकद निर्माण व्हावी, त्या स्वत:चे संरक्षण करण्यास सक्षम व्हाव्यात. हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे डॉ.अनिल बोंडे म्हणाले.