अमरावती- जिल्ह्यातील कौडण्यपूर येथील वर्धा नदीपात्रातून रेती चोरी करून वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. तिवसा तहसीलदार व त्यांच्या पथकाने कुऱ्हा पोलिसांच्या मदतीने काल मध्यरात्री २ च्या सुमारास ही कामगिरी केली. तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
तिवसा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे येथील प्रत्येक नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. ज्यामुळे नदीपात्राच्या काठावर मोठ्या प्रमाणात रेती जमा झाली आहे. या रेतीवर तस्करांचा डोळा आहे. तस्करांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. अशातच काल अंबिकापूर घाटातील वर्धा नदीपात्रात रेतीचे उत्खनन करून तिची वाहतूक होत होती. यावेळी तहसीलदार वैभव फरतारे यांच्यासह नायब तहसीलदार दत्तात्रय पंधरे यांनी अंबिकापूर घाटावर धाड टाकून तेथून रेती वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या कारवाईत तहसीलदार फरतारे यांना कुऱ्हा पोलिसांची देखील साथ लाभली. तसेच महसूल प्रशासनाचेही सहकार्य लाभले.
तालुक्यात जावरा, फत्तेपूर, शेंदूरजना बाजार, कौडण्यपूर, तळेगाव ठाकूर, भारवाडी, उंबरखेड, निंभोरा आदी गावातील नदी पात्रात रेतीचे उत्खनन करून तिची अवैध वाहतूक केली जात आहे. यासाठी महसूल प्रशासनाने या ठिकाणांवर कारावाई करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे. या कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने देखील महसूल विभागाला साथ देणे गरजेचे आहे.
हेही वाचा- अंघोळीसाठी गेलेले तीन चिमुकले नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही मृत्यू