अमरावती - अमरावतीच्या बडनेरा रेल्वे जंक्शन येथे गुड्स वॅगन रिपेअर लाईनच्या कामानिमित्त मेगा ब्लॉक घेण्यात आला असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर विदर्भातुन मुंबई-पुणेला जाणाऱ्या व येणाऱ्या तबल २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. सणासुदीच्या दिवसांत येणाऱ्या नागरिकांना मात्र आता जबर फटका बसणार आहे.
या गाड्या रद्द -
मेगा ब्लॉकमुळे २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर रोजी धावणारी मुंबई-अमरावती एक्सप्रेस, याच तारखेला धावणारी अमरावती-मुंबई एक्सप्रेस, २७ ऑक्टोबरची पुणे-अमरावती एक्सप्रेस, २८ ऑक्टोबरची अमरावती-पुणे एक्सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची नागपूर- सीएसएमटी एक्सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-सीएसएमटी एक्सप्रेस, ३० ऑक्टोबरची पुणे – नागपूर एक्सप्रेस, २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्सप्रेस, २८ ऑक्टोबरची पुणे-नागपूर एक्सप्रेस आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली.
प्रवाशांची उडाली तारांबळ
सध्या नोकरदार वर्ग मुंबई-पुण्याहून आपल्या गावाकडे येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी महिन्याभरापूर्वी या नोकरदार वर्गाने रेल्वेचे आरक्षण देखील केले. परंतु आता ऐन वेळेवर आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली आहे. त्यात एसटी बसचे तिकीट आणि खाजगी बसचे देखील दर वाढल्याने याचा फटका काही प्रवाशांना बसणार आहे.