अकोला - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन विकले न गेल्यामुळे खरीप हंगामात शेती करण्यासाठी पैसा कुठून आणावा, असा प्रश्न शेतकर्यांना पडलेला आहे. अशात यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अकोला युनिटने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात समोर केला आहे. असोसिएशनने अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील 210 शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दोन किलो तुरीचे बियाणे मोफत वितरित केले आहे.
असोसिएशनच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. असोसिएशनच्या सदस्यांनी 40 हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीमधून सव्वाचार क्विंटल तुरीचे बियाणे खरेदी करण्यात आले. हे बियाणे अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील 210 शेतकऱ्यांना प्रति दोन किलो याप्रमाणे वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य शुभांगी भटकर, असोसिएशनचे कार्याध्यक्ष शरद भागवत, दीपक भाकरे, देविदास राठोड, गोपाल भाकरे, सुरेश भटकर, संतोष कराळे यांची विशेष उपस्थिती होती.
बियाणे वितरित करीत असताना सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर करीत हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात आला. यासाठी असोसिएशनचे सचिव विलास पाटील, स्वानंद कोंडलीकर, अभिषेक जाधव, संदीप गुप्ता, श्रीकांत बाहेकर, विजय भटकर, दिलीप घुगे, संदीप सरडे, मोहन विठलानी, प्रा. संजय नाईकवाड यांनी मदत केली.