अकोला: बाळापुर आणि अकोला तालुक्यातील 69 गावांमध्ये वाण धरणाचे पाणी मिळविण्यासाठी असलेल्या योजनेला स्थगिती दिल्याच्या विरोधात आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायदळ वारी केली होती. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारात असताना, वाण धरणातील पाणी हे बाळापुर व अकोला तालुक्यातील अशा एकूण 69 गावांना मिळावे, यासाठीची योजना राज्य शासनाकडून मंजूर केली होती. या योजनेचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने ही योजना स्थगित केली. त्यामुळे या योजनेचे काम रखडले आहे.
योजना अचानक केली बंद: 69 गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी राबविण्यात आलेली ही योजना अचानक बंद करण्यात आल्याने या विरोधात बाळापूरचे आमदार तथा ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांनी खारपाणपट्ट्यातील खारे पाणी जमा करून, हे पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी नेण्यासाठी अकोला ते नागपूर पदयात्रा काढली. या यात्रेला नागपूर येथे पोलिसांनी अडवले होते.
धरणे आंदोलन केले सुरू: दरम्यान, ठाकरे गटाचे आंदोलन संपत नाही तोच वारी धरणावर तेल्हारा व अकोट येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या आंदोलनाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रहारचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. वाण धरणाचे पाणी हे सिंचनासाठी आवश्यक आहे. हे पाणी सिंचनासाठीच जास्त आरक्षित असल्यामुळे या पाण्याचा परिसरातील 14 हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होत आहे. त्यामुळे हे पाणी कुठल्याही गावाला देऊ नये, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या योजनेवरील स्थगिती उठू नये, यासाठी हे ग्रामस्थ व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पाणीपुरवठा योजना राबवावी: बाळापुर विधानसभा मतदारसंघांमध्ये पाण्याची उपलब्धता शोधून त्या ठिकाणी तिथेच पाणी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी या शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची आहे. कुठल्याही प्रकारचे पाणी आम्ही या वाण धरणातून 69 ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला जाऊ देणार नाही, असा इशारा या ग्रामस्थांनी शासनाला दिला आहे. शासनानी स्थगिती दिलेली आहे, ती जर उठविली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही या ग्रामस्थांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी केला विरोध: वाण धरणाचे पाणी हे सर्वात जास्त सिंचनासाठी आरक्षित करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना 80 किलोमीटर दूरवर 69 गावातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते. हा प्रकार येथील शेतकऱ्यांच्या मानगटीवर पाय ठेवण्यासारखा होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. प्रहार आणि लोकजागर मंच त्यासोबतच इतर राजकीय पक्षाकडूनही या आंदोलनाचे समर्थन करण्यात येत असल्याचे प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: MLA Nitin Deshmukh माझ्या जीवाला राज्य शासनाकडून धोका आमदार नितीन देशमुख यांचा आरोप