अकोला - श्रीराम जन्मोत्सव अकोल्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्या दहा दिवसांपासून मंदिर बंद असल्याने भाविक मंदिरात गर्दी करत आहेत. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यभरात संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही कलम १४४ चे उल्लंघन करत नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करत आहेत. सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे एकप्रकारे उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनच्या काळात वारंवार राज्यातील जनेतेसोबत संवाद साधलेला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, अशा सुचना अनेकदा केल्या आहेत. तसेच शासनाने धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून सरकारी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. परंतु, हा उत्सव यावर्षी रद्द झाला आहे. कोरोना विषाणुमुळे राज्य शासनाने धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर तेथे होणाऱ्या उत्सवांवरही गदा आली आहे. श्रीरामाच्या मंदिरासमोर शेकडो भाविक पहाटेपासून श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी गर्दी करीत आहेत. मंदिर बंद असल्याने मंदिराच्या बंद द्वारा समोरच नतमस्तक होऊन भाविक दर्शनाचा अनुभव घेत आहेत.