अकोला - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर -
चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपले आयुष्य घडत असते. त्यांनी दाखविलेले मार्ग हे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून एका यशोशिखरावर पोहोचवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे प्रशासकीय सेवेत असो किंवा सामान्य नागरिक म्हणून जगत असताना प्रत्येक जण आपल्याला मार्गदर्शन करीत असतो. हे मार्गदर्शन आयुष्य बदलण्यासाठी महत्वाचे ठरते, अशी भावना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, आयुष्य जगताना पदोपदी आपल्याला गुरुची गरज भासत असते. येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मिळणारा बळरुपी सल्ला हा नवीन काहीतरी शिकवण्यासाठी देत असतो. मी दहावीमध्ये शिकत असताना इंग्रजीचे शिक्षक पाटील सर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज हे यश मिळाले आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग खडतर होता. मात्र, तो पूर्ण करण्यासाठी मी घेतलेली त्यांच्या मार्गदर्शनामधील मेहनत हे त्यांचेच यश आहे. तर मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे नेहमीच आकलन करून ते कृतीत आणण्यासाठी धडपड करणे गरजेचे, असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.