अकोला - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेलेले बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे आज तक्रार ( Wife lodges complaint at police station ) दाखल केली आहे. सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत त्यांनी माझे पती आमदार नितीन देशमुख हे सोमवारपासून बेपत्ता ( Sena MLA Missing ) असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पतीचा शोध लावा - आपल्या पतीचा लवकरात लवकर शोध लावा, असे त्यांनी तक्रारीच्या माध्यमातून पोलिसांकडे साकडे घातले आहे. प्रांजल नितीन देशमुख असे तक्रारकर्त्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान नितीन देशमुख यांचा मुक्काम एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, आज सकाळी छातीमध्ये दुखू लागल्यामुळे देशमुख यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नितीन देशमुख यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याची माहिती आहे.
पतीचा फोनही बंद - माझे पती नितीन देशमुख बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली सोमवारी संध्याकाळी सहा वाजता पासून माझ्या पतीसोबत माझे शेवटचे बोलणे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी थोड्याच वेळात मुंबईहून अकोल्याला येण्यासाठी निघेल, असे त्यांनी मला फोनवर सांगितले मात्र सात वाजल्यापासून त्यांचा फोन बंद आहे. त्यांचा पीए आणि सहकारी स्टेशनवर त्यांची वाट बघत होते. मात्र ते विधानभवनातून परत आलेच नाहीत. कालपासून माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाह. त्यामुळे मी अकोला शहर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी त्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणीही पांजल देशमुख यांनी केली आहे.
आमदार नितीन देशमुख हे शिवसेना पक्षाचे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहेत. निवडणुकीमध्ये त्यांना भाजपकडून चांगले सहकार्य मिळाले असल्याची चर्चा आहे. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते त्यासोबतच देशमुख यांचे भाजपच्या काही नेत्यांसोबत हे चांगले संबंध आहेत. तसेच मागील विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला होता.
हेही वाचा - Anil Parab ED Inquiry : शिवसेना दुहेरी संकटात; अनिल परब यांची सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू