अकोला - महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पदार्थ यांना मार्केटिंग मिळावे, यासाठी उमेद अभियाना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये 'मोरणाई रुलर मॉल'चे उद्घाटन आज करण्यात आले. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग आहे. या ठिकाणी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पदार्थ विकल्या जाणार आहेत. यातून त्यांना मार्केटिंगची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विविध उपक्रम
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत महिला बचत गटांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट मिळावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविला जात आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरातील एका जागेवर मोरणाई विक्री केंद्र 'रुरल मॉल' या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भोजने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, यांच्यासह लीड बँकेचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ आणि साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पदार्थ आणि साहित्य खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन
महिला बचत गटांना स्वयंपूर्ण करण्यासाठीचा हा उपक्रम यशस्वी ठरविण्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
'उत्पादक ते ग्राहक' ही संकल्पना
ग्रामीण भागामध्ये स्थापित स्वयम् सहायता समूहद्वारा निर्मित वस्तू व कलाचे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्ह्यात प्रथमच स्वयम् सहायता समूह द्वारा उत्पादित वास्तूंचे आणि कलांचे विक्री करीत ग्रामीण मॉलची सुरुवात करण्यात आली आहे. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून गुणवत्ता पूर्ण उत्पादने थेट ग्राहकापर्यंत पोहोचविणे शक्य होईल.