अकोला- वंचित बहुजन आघाडीपासून काडीमोड केल्यानंतर रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आता राज्यभरात स्वतंत्रपणे पक्षबांधणी करीत आहे. पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेना स्वतंत्रपणे उभी राहून निवडणूक लढणार, असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबराते यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा- देवळा येथील अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
पुढे ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी पासून आम्ही दूर गेलो आहोत. पक्षाचे संघटन मजबूत करणे हा त्यामागचा उद्देश असून स्वतंत्रपणे पक्ष उभा करण्याचा आमचा निर्धार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन सेना राज्यभरात पाय रोवत आहे. जिल्ह्यामध्ये ही रिपब्लिकन सेना पक्ष मजबूत करणार आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे मोठे वलय आहे. तरीही रिपब्लिकन सेना जिल्ह्यात पक्ष बांधणी करीत आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्ष संघटन करून प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्धार पक्षाचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्याच आदेशान्वये पक्ष वाढविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी प्रदेश महासचिव कुमार कुर्तडीकर, प्रदेश उपाध्यक्ष युवराज घसवडीकर, बंडू प्रधान, श्रीपती ढोले आदी उपस्थित होते.