अकोला - श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कावड व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोरोनामुळे हा उत्सव सीमित करण्यात आला आहे. मानाच्या पालखीला 20 जण घेऊन जातील व गाडीनेच परत येतील. या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज राजराजेश्वर मंदिरात जाऊन पालखी व कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
76 वर्षांपासून राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कावड मंडळ व पालखी मंडळ हे अनवाणी पायाने 18 किलोमीटर पायी जाऊन गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून जल आणतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी पहाटे ते राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. हा उत्सव अकोल्यात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. परंतु, कोरोनामुळे या उत्सवावर बंदीचे सावट आले होते.
पालखी मंडळ व पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मानाची पालखी ही एका गाडीमध्ये 20 जणांसोबत जाऊन गाडीतून परत येवून राजराजेश्वराला जलाभिषेक करेल, असा निर्णय झाला होता. परंतु, हा निर्णय मंडळांना मान्य करावा लागला. त्यानंतर या विषयावर पालखी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली. त्यावेळी सरकारने पालखी कावड परंपरेचा सन्मान राखावा. यातून सरकारने सकारात्मक तोडगा काढावा. पालखी कावड उत्सव हा शिवभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे.
सरकारने श्रद्धेला धक्का लागेल याकरिता कुठलाही निर्णय घेऊ नये. आपण स्वतः पालकमंत्री व प्रशासन आणि शिवभक्त यांच्यामध्ये बैठक घडवून आणण्यासाठी घडवून प्रयत्न करू, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कावड व पालखी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत सांगितले. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, आकाश शिरसाट यांच्यासह कावड मंडळाकडून अध्यक्ष चंदू सावजी, अॅड. आर. एस. ठाकरे, गजानन घोंगे यांची उपस्थिती होती.