अकोला- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत सर्वच कार्यक्रम आणि उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. निर्बंधामुळे अनेक व्यवसाय प्रभावित झाले असून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो परिवारांवर उपासमारीचे संकट आले आहे. शासनाने पुढील अनलॉकमध्ये विवाह समारंभास परवानगी देऊन त्यामध्ये 500 नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी. लग्न समारंभात चार ऐवजी आठ फोटोग्राफर्सना परवानगी द्यावी, अशी मागणी अकोला बुलडाणा फोटोग्राफर्स असोसिएशन व विवाह सेवा संघर्ष समितीने आज केली आहे.
अकोला बुलडाणा फोटोग्राफर्स असोसिएशन व विवाह सेवा संघर्ष समितीने शुभकर्ता लॉन्समध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. फोटोग्राफर्स कोरोनाच्या काळात अडचणीत आले आहेत. अनेक फोटोग्राफर्सवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.लॉकडाऊन काळात फोटोग्राफर्सना कोणीच आधार दिला नाही. शासनाने त्यांना आधार देत अनुदान द्यावे आणि विविध योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी अकोला बुलडाणा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे यांनी केली.
विवाह व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी विवाह सेवा संघर्ष समिती यांच्यावतीने करण्यात आली. शासनाने मागणी मान्य केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा समितीचे भैय्या उजवणे यांनी दिला आहे. लग्न समारंभात उपस्थित राहण्यास 500 व्यक्तींना परवानगी देण्यात यावी, अशी ही मागणी त्यांनी केली आहे.
अनलॉकमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांना परवानगी मिळत आहे. परंतु, विवाह सोहळ्याशी संबंधित व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली नाही. या व्यवसायाशी निगडित असलेल्या हजारो मालक, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कोट्यवधी रुपये या व्यवसायात अडकले आहेत. विवाह सोहळ्यात उपस्थिती संख्या सीमित केल्याने व्यावसायिकांचे आधीच नुकसान झाले आहे. पुढील अनलॉकमध्ये विवाहावरील निर्बंध न उठवल्यास राष्ट्रव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे दादासाहेब उजवणे दिला आहे.यावेळी किरण शाह, योगेश कलनत्री, संदीप देशमुख, मंगेश गीते, बाबू बागडे यांच्यासह दिग्विजय देशमुख, नितीन देशमुख, राहुल गोटे, योगेश उन्होने, नीरज भांगे, उमेश चाळशे,आदी उपस्थित होते.