अकोला - सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान टेकडी येथे नवरात्र उत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. बोर्डी नदी किनारी असलेल्या या मंदिरात नवरात्रौत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते. देवीचे दर्शन घेऊन नवस मागण्यात येतो. भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या रेणुका मातेच्या मंदिरात नऊ दिवस देवीचा जागर असतो.
मातेच्या गडावर जाण्यासाठी सिमेंटच्या 240 पायऱ्या आहेत. पायऱ्यांवर मंदिराचे व्यवस्थापक स्व. दिनानाथ महाराजांची समाधी, हनुमान मंदिर, गणपती मंदिरही आहेत. मंदिराच्या सभामंडपात पाय ठेवताच मनाला एक प्रकारची शांती मिळते. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक येथे श्रद्धेने येऊन मातेला साखळी घालतात. 'माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, असे गाणे म्हणत भक्त माऊलीच्या चरणी लीन होतात.
हेही वाचा - अकाेल्यात निवडणूक आयोगाच्या पथकाकडून साडेपाच लाखांची रोकड जप्त
नवरात्र उत्सवात या मंदिरात जिल्ह्यातीलच नव्हे तर वाशिम, जळगाव, अमरावतीसह इतर जिल्ह्यातील भक्त येथे दर्शनासाठी येतात. पहाटे आणि सायंकाळी सहा वाजताची आरती करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. नऊ दिवस या मंदिरात देवीचा जागर चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम येथे होतात, महाप्रसाद दिला जातो. अनेक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करतात.
हेही वाचा - अकोला: लोकअदालतमध्ये होणार 11 हजार धनादेश अनादर प्रकरणांचा निपटारा
विशेष म्हणजे, मंदिरावर कृष्ण, दत्त, राम आणि अनुसया मातेचे व महादेवाचे मंदिर आहे. तर मंदिराच्या पायथ्याशी तपे हनुमान मंदिर आहे. तसेच उत्तरेकडे नानासाहेबांचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरातही भाविक दर्शनाचा लाभ घेतात.