अकोला - रस्त्याच्या कडेला तीनचाकी गाडी घेवून उभे असलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना डाबकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाबकी रोड नाक्या समोर घडली प्रभाकर ढेरे असे मृत व्यक्तीचे नाव असून महेंद्र उमाळे असे ट्रकचालकाचे नाव आहे.
डाबकी रोड जकात नाक्यासमोरील रस्त्याच्या वळणावर प्रभाकर ढेरे हे तीनचाकी हात गाडी घेवून उभे होते. या रस्त्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी ट्रक रेती, गिट्टी घेवून ये-जा करीत असतात. गिट्टी टाकून ट्रक (क्र. एमएच 30 ए व्ही 805) हा मुख्य रस्त्यावर येत असताना ट्रकने वळण घेतले. प्रभाकर ढेरे यांच्या जवळून ट्रक जात असताना ट्रकचा धक्का त्यांना लागल्याने ते ट्रकखाली सापडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक ट्रक सोडून तो डाबकी पोलिस ठाण्यात पळून गेला.
हा ट्रक रस्ता करणाऱ्या ठेकेदाराचा असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी कमी केली. तसेच मृतक ढेरे यांचा मृतदेह एका रिक्षामध्ये सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला. राहुल प्रभाकर ढेरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
हेही वाचा- अकोला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती