अकोला - विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसंत खंडेलवाल आणि महाविकास आघाडी तथा शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे आणि महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षातर्फे वसंत खंडेलवाल यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या सोबतच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने या उपस्थित होत्या.
विधान परिषदेसाठी भाजप व महाविकास आघाडी उमेदवारांकडून अर्ज दाखल भारतीय जनता पक्षाने मला दिलेल्या संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास वसंत खंडेलवाल यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भारतीय जनता पक्षाकडून पराभव करण्यात येईल, असे ठाम मत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय कुटे यांनी व्यक्त केले.महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज येथे दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत, प्रतापराव जाधव, अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, शहराध्यक्ष विजय देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण हे उपस्थित होते.तीन वेळा विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या मतदारांनी व इतरही पक्षाच्या मतदारांनी मला सर्वाधिक मतांनी निवडून दिलेले आहे. यावेळी विजयाचा चौकार सर्वात जास्त मतांरुपी षटकार मारणार असल्याचा विश्वास गोपीकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केला.
अर्ज भरून आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी केली घोषणाबाजी शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाहेर आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत खासदार अरविंद सावंत यांनी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलीस आणि लोकप्रतिनिधीमध्ये वाद -
उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष उमेदवार व इतर चार व्यक्तींना पोलिसांनी आतमध्ये प्रवेश दिला. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे पोलीस आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी यामध्ये मध्यस्थ भूमिका घेत प्रकरण शांत केले आणि सर्वांना प्रवेश दिला.