अकोला : शहरातील जातीय तणावाला पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी केली आहे. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील घटनांच्या मूळ कारणाचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे या घटनांना जबाबदार कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या घटना घडतच राहणार आहेत. राज्यातील शांतता भंग करण्याचे काम काही लोकांकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तातडीने कारवाई करून या घटनेचे मूळ शोधून काढावे - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विधान परिषद
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला हजारो वर्षाची परंपरा आहे. काही लोक तेथे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला शुल्लक सेना म्हणून टोला मारला होता. याला प्रतिउत्तर अंबादास दानवे यांनी आज अकोल्यात दिले. आपण किती उरलो आहोत हे निवडणुकीतून दिसून येईल. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही निवडणुकीची मागणी करत असताना सरकार निवडणुका घेण्यास का नकार देते? सरकार निवडणुकीला का घाबरते, असा सवाल दानवे यांनी केला.
कारवाई करण्याची मागणी : राज्यात सामाजीक वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. दोन्ही गटांमधील तणाव कायम ठेवण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहेत. मात्र यामागे कोणाचा हात आहे? याचा तपास सरकारने किंवा पोलिस प्रशासनाने करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराला पोलिस अधीक्षकच जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे ते म्हणाले.
विलास गायकवाड यांच्या कुंटूंबाला मदत : यापूर्वी १३ मे रोजी रात्री अकोला शहरातील ओल्ड टाऊन परिसरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. तसेच दहा जण जखमी झाले होते. या घटनेची माहिती घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोल्यात आले. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाळ दातकर, शहरप्रमुख अतुल पवनीकर आदी उपस्थित होते. यावेळी अंबादास दानवे यांनी राजराजेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांनी मृत विलास गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन शोक व्यक्त केला. तसेच त्यांच्या कुंटूंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.
हेही वाचा -
Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत