अकोला - जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न यावर्षी सुटलेला आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. मात्र, काटेपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी दुसरा रस्ता पकडला आहे. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडत असून शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी धावाधाव करीत आहे. रब्बी हंगाम लागला, तरी कालव्यांची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने केली नाही. तर सध्या या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केल्यामुळे साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार हा विभाग करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
कालव्यामध्ये उगवली गांजरगवत आणि झाडे -
काटेपूर्णा प्रकल्पावर साडेतीन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येत आहे. या वर्षी हा प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे. कालव्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविले जात आहे. परंतु, बरेच कालवे हे खराब झाले असून अनेक कालव्यामध्ये गांजर गवत, झाडे उगवली आहेत. तर काही कालवे हे खचलेले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे काही दहिगाव गावंडे या गावाला लागून असलेल्या जवळपास दहा ते पंधरा गावांमध्ये दोनशे ते अडीचशे एकर जमीन पाण्याखाली जमीन गेलेली असताना ती ओलीत होत नाही. परंतु पाटबंधारे विभागाच्या बेफिक्रीमुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हे चिंतित झाले असून त्यांना रब्बी हंगामातही पीक घेता येणे शक्य झाले झाले नाही.
हा साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार -
दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. परंतु, हा प्रस्ताव मंजूर केव्हा होईल व त्या कामाचे नियोजन केव्हा होईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर जर पाटबंधारे विभाग या कालव्याच्या कामाला सुरुवात करत असेल, तर या शेतकऱ्यांसाठी हा दुरुस्तीचा खर्च शून्य ठरणार आहे. त्यामुळे साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार पाटबंधारे विभाग करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांना विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला असून याबाबत अभ्यासपूर्वक बोलेन, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. त्यामुळे या दुरुस्तीच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे पाणी मुरत आहे, का असा प्रश्रही उपस्थित होत आहे.
पाणी न पोहोचणारी गावे -
रामगाव, दापुरा, मजलापूर, मुजरे, मोहम्मदपूर, कौलखेड, कानडी, दहिगाव गावडे, बहीरखेड, भटोरी, पळसोबढे जांभा यासह आदी गावात पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिके घेता येत नाही आहे. तर काही शेतकरी बाहेरून पाणी आणत आहेत.
हेही वाचा- मोफत पाणी आणि वीज.. हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध