अकोला - अनाथाश्रमात लहानाची माठी झालेल्या अनुराधा वानखडे हिचा विवाह ३१ जानेवारी रोजी होणार होता. मात्र, विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना गुडधी येथील अनाथाश्रमात घडली. तिच्यावर आज उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनाथाश्रमातील सर्वांनी तिला साश्रूनयनानी निरोप दिला.
हेही वाचा - शेतकरी पुत्राची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; अपंग मुलांचा आधार हरपला
लहान असतानाच अनुराधा वानखडे हिला गुडधी येथील अनाथाश्रमामध्ये ठेवण्यात आले होते. अनाथ असल्याचे प्रचंड दु:ख असतानाच १८ वर्षाची होताच तिला जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी शिवा वानरे यांनी लग्नाची मागणी घातली. अनुराधालाही प्रचंड आनंद झाला. ३१ जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकण्याच्या आनंदात असतानाच आज सायंकाळी अनाथाश्रमामध्ये वरच्या माळ्यावर अनुराधाला विजेचा धक्का लागला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अनुराधाचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती शिवा वानरे यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अनुराधाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका अनाथ मुलीशी विवाह करून एक वेगळी प्रेरणा देण्याचा प्रयत्न शिवाने केला होता. मात्र, दोघांचेही सुख नियतीला पाहावले नाही. आणि एका अपघातात अनुराधाचा मृत्यू होताच एका संसारवेलीची सुरुवात होण्यापूर्वीच घात झाला.
हेही वाचा - अकोला सायकल ग्रुपची 'रविवारची सायकल वारी' देते उत्साह