अकोला - सामाजिक संस्था स्थापन करून गरजूंना आधार देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतु स्वतः जबाबदारी घेऊन गरजूंना आधार देणारे फारच कमी आहेत. अकोल्यातील हॉटेल व्यावसायिक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलामुलींचे सामूहिक विवाह करतात. शासनाच्या मदतीविना ते हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. आता त्यांनी कोरोनामुळे ज्या लहान मुलांच्या आईवडीलांचे निधन झाले आहे, अशा दहा पाल्यांचे ते आधारवड झाले आहेत.
मुलांना मिळतोय आधार
कोरोनामुळे अनेक मुलांचे आईवडिल गेले. अशा मुलांना आधार देण्यासाठी आता समाजातील विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. तर दुसरीकडे समाजातील काही दानशुर व्यक्तिंकडूनही या मुलांना मदतीचा हात दिला जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मुरलीधर हे नेहमीच अनाथांसाठी नाथ झाले आहे. अनाथ मुलामुलींचे विवाह करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आताही एक चांगले सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे ज्या लहान मुलामुलींचे आईवडील किंवा ज्यांचे संगोपन करण्यासाठी कोणीच नाही, अशांना ते दरमहा एक हजार रुपये देऊन त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे. ते एवढ्यावरच नाही थांबले तर अशा मुलांचा शिक्षणाचा खर्चही ते करणार असून त्यांच्या वयाच्या 20 वर्षांपर्यंत ते मुलामुलींचे संगोपन करणार आहे. त्यांची ही सामाजिक जाणीव अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
पंतप्रधानांनी साधला होता 'मन की बात'मधून संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुरलीधर राऊत यांच्याशी 'मन की बात'मध्ये संवाद साधला होता. कोरोना काळात परराज्यात जाणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या हॉटेलमधून मोफत जेवण दिले होते. त्यामुळे हजारो भुकेलेल्यांना त्यांच्यामुळे पोटभर जेवण मिळाले होते. याचीच दखल घेऊन मुरलीधर राऊत यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता.
हेही वाचा -मराठा आक्रोश मोर्चा: सोलापुरात दोन तासांच्या ठिय्यानंतर मोर्चा मार्गस्थ