अकोला - राज्यामध्ये सध्या संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीतही गावठी दारू भट्टी चालवणाऱ्या विरोधात पोलिसांनी ग्रामीण व शहरी भागामध्ये कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दानापूर या गावामध्ये सलीम खान मजित खान हा अवैधरीत्या दारू पट्टी चालवीत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याच्यावर धाड टाकून त्याच्याकडील दारूभट्टी साठी असलेले साहित्य नष्ट करून पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दानापूर येथील नागोराव ओमकार उन्हाळे याच्याकडे ही कारवाई करीत 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गावठी दारू साठीत असलेले साहित्य नष्ट करण्यात आले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई होत नाही तोच अकोला शहरातील रामदास पेठ पोलिसांनीही गवळीपुरा येथे कारवाई करीत घरात सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा टाकला. पोलिसांनी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये गुन्हाही दाखल केला आहे. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने नायगाव येथील हुसेन बुददु नौरंगाबादी, शकील इब्राहिम परसूवाले, जमीन मेहबूब भैरववाले यांच्याकडे सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर छापा टाकला. यात दोन लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यासोबतच दारूसाठी वापरण्यात येणारे साहित्यही नष्ट करीत या तिघांवर ही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे संचारबंदीमध्ये अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.