अकोला - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकड्याने शंभरी पार केली आहे. आतापर्यंत 104 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे, एकूण रुग्ण 2 हजार 140 गेली असून सक्रिय रुग्ण हे 307 आहेत. तर 1 हजार 729 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना दुसरीकडे मृत्यूचा दरही वाढत आहे. अनेक रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याने मृत्यू वाढत आहे. तर अनेक रुग्ण हे उपचार घेताना मरण पावत आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचा टक्का चांगला असला तरी रुग्णांची मृत्यूची संख्या ही चिंताजनक आहे.
नवीन 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 3 महिला व 2 पुरुष आहेत. हे रुग्ण अकोला शहरातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वार्टर, खेतान नगर, जीएमसी या भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, रविवारी रात्री दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून एक 60 वर्षीय इसम गुलजार पुरा येथील तर अन्य एक 55 वर्षीय इसम लक्ष्मीनगर येथील रहिवासी आहे. हे दोघे 11 जुलैला रुग्णालयात दाखल झाले होते. काल रात्री रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.