अकोला - कोरोना व्हायरसचा संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रस्त्यावर कुणीही विनाकारण फिरू नये असे आदेश आहेत. या आदेशाचे आज पहाटेपासूनच अकोलेकरांनी पालन केल्यासारखे दिसून येत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची दररोज मोठी गर्दी असते. परंतु, संचारबंदी लागल्यानंतर मॉर्निंग वॉकच्या वेळी फारच तुरळक गर्दी होती. जुने शहरातील बाळापूर नाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर लोकांची पहाटे फिरण्याची गर्दी कमी असल्याने संचारबंदीला उत्तम प्रतिसाद दिसत होता.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. त्या उद्देशाने नागरिकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. अकोल्यामध्ये मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक कमी प्रमाणात दिसले. मात्र, दिवसभरामध्ये संचारबंदी तोडण्याचा अनेकांकडून प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीपण पोलीस विभाग ठिकाणी व चौकाचौकांमध्ये नाकाबंदी करून नागरिकांची विचारपूस व तपासणी करणार आहेत. वेळप्रसंगी ते गुन्हे दाखल करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून घरातच राहावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.