अकोला - कोरोना बाधितांची संख्या व कोरोनाचा मृत्यू दर झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत पाहणी केली. यावेळी पथकांनी जीएमसीच्या डॉक्टरांची कोरोना बाधितांसाठीची उपचार पद्धती व इतर आवश्यक बाबींसंदर्भात माहिती घेतली. पथकाने व्हीआरडीएल व कोरोना वॉर्डाला भेट दिली. उपचार पद्धतींत करावयाच्या बदलासंदर्भात पथकाने डॉक्टरांना मार्गदर्शनही केले.
कोरोनाचा वेगाने प्रसार होणाऱ्या जिल्ह्यांतील उपाययोजनांची माहिती व कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झालेले आहे. या पथकातील सदस्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळपासूनच हजेरी लावली. या पथकाने कोरोना रुग्णांच्या अहवालांची तपासणी करणाऱ्या व्हीआरडीएल लॅबची पाहणी केली. लॅबमध्ये दररोज करण्यात येत असलेल्या चाचण्यांची लॅबची क्षमता वाढू शकते का? या बाबत पथकातील डॉक्टरांनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कोरोनासाठी असलेल्या वॉर्डाला भेट दिली. पथकातील डॉ. महेश बाबू यांनी थेट आयसीयूमध्ये प्रवेश करत रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचार पद्धतीची माहिती घेतली. तर डॉ. चतुर्वेदी यांनी ऑक्सिजन प्लान्टची पाहणी केली. यानंतर या पथकाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यासोबतच पथकाने खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर कोणत्या पद्धतीने उपचार करण्यात येत आहे. याबाबत शहरातील ओझोन व आयकॉन रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली. हेही वाचा-राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन केल्यास पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा