अकोला - अकोला ते अकोट राज्यमार्गावर सोमवारी रात्री अंदाजे साडेनऊच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अकोल्याहून अकोटकडे जाणाऱ्या धावत्या इंडिका गाडीने वनी वारूळा गावाजवळ पेट घेतला. दरम्यान, प्रसंगावधान राखत चालक गाडीच्या बाहेर निघाल्याने अनर्थ टळला. मात्र, गाडी संपूर्ण जळून खाक झाली.
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक
या अपघातानंतर, अकोट येथील अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले होते. काही वेळेकरिता या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही कार अकोटकडे जात असताना तिच्या समोरील भागातून धूर निघायला सुरुवात झाली. काही वेळाने गाडीने पेट घेतला. कार चालकाने लगेच कार बाजूला घेतली आणि तो बाहेर निघाला.
काही क्षणातच कारमधील आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाला होता. अकोट अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दल येण्याआधीच ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही कार नेमकी कोणाची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.