अकोला - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत भाजपचे सभापती आणि शिवसेनेचे नगरसेवक यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर आज खडाजंगी झाली. यावेळी सेनेचे नगरसेवक गजानन चव्हाण यांनी समोरील टेबल फेकून विरोध दर्शविला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव पाहून विरोधकांनी मात्र चांगलीच मजा घेतली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभेला सभापती विनोद मापारी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सभा सुरू असताना भूमिगत गटार योजनेच्या पंपिंग मशीन खरेदी विषयाबाबत माहिती मिळत नसल्याची सबब समोर करीत शिवसेनेचे नगरसेवक गजानन चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे सभापती मापारी यांनी गजानन चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांमध्ये वाद विकोपाला गेल्याने शिवसेनेचे नगरसेवक गजानन चव्हाण यांनी रागाच्या भरात समोर असलेला टेबल फेकून दिला. त्यांच्या या कृत्यामुळे सभापती मापारी यांनी सुरक्षारक्षकांना त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. त्याच वेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गजानन चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहत विरोधकांनी चांगलीच मजा घेतली.
या प्रसंगामुळे महापालिकेत विरोधकांचे काम शिवसेनाच करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ज्याप्रमाणे राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही विरोधकाची भूमिका घेते, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्तेत असलेल्या शिवसेना राज्या सारखा कित्ता गिरवित असल्याचा प्रकार आज पुन्हा अकोला महापालिकेत घडला. दरम्यान, स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी शिवसेनेचे गजानन चव्हाण यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे सांगितले.