अकोला - जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील अपंगांना १ हजार रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अशी पेन्शन योजना राबविणारी अकोला जिल्हा परिषद पहिली ठरली आहे.
शासनाच्या पेन्शन योजना पेक्षा जास्त निधी जिल्हा परिषद दिव्यांगांना देत आहे. राज्य शासनातर्फे दिव्यांगांना प्रतिमहिना ६०० रुपये पेन्शन दिली जाते. दिव्यांगांसाठी ही पेन्शन अपुरी असली तरी शासनाचा हा उपक्रम त्यांच्यासाठी हातभार लावणारा आहे. या उपक्रमाला जोड देण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील ५० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्ती किंवा महिलेला १ हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी दिली.
जिल्हा परिषद या योजनेसाठी दरवर्षी २९ लाख रुपये खर्च करणार आहे. दिव्यांगासाठीची पेन्शन योजना चालु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा मोठा सहभाग आहे.