अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष पथकाची जबाबदारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याकडे काल (मंगळवार) पासून दिली आहे. पदभार स्वीकारताच पथक प्रमुख पाटील यांनी तीन विविध ठिकाणी जुगारांवर छापा टाकून ६ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत 31 जणांवर कारवाई केली. पहिल्याच दिवशी केलेल्या कारवाईने शहरातील जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारांवर छापा टाकला. या छाप्यात त्यांनी 13 जणांवर कारवाई करीत चार लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दुसरी कारवाई ओत फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा नगरात जुगारांवर केली. या कारवाईत दहा जणांवर गुन्हा दाखल करीत एक लाख 30 हजार 900 रुपये जप्त केले. तर एक लाख 19 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आठ जणांवर कारवाई करून पथकाने तिसरी कारवाई सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भाजीबाजारातील जुगारावर केली.
अवैध धंदे जोरात; पथकाच्या कारवाईतून स्पष्ट
विशेष पथकाने शहरातील तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापेमारी केली. या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे सिद्ध केले आहे. गुन्हेगारीवर वचक बसविण्यात पोलीस अधीक्षक अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी हेल्मेट सक्ती करण्याआधी शहरातील अवैधधंदे बंद करून गुन्हेगारी आटोक्यात आणावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.