अकोला - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) आज देशभरात नीटचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी भाजपाकडून निःशुल्क वाहन व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेतून 927 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला.
कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यात अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी भाजपाच्यावतीने वाहतूक व्यवस्था उभी करण्यात आली. अकोल्याच्या ग्रामीण भागातील आणि बाहेरगावावरून अकोल्यात आलेल्या विद्यार्थ्यांना या वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नेण्यात आले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल, गिरीश जोशी, माजी महापौर अश्विनी हातवळणे, यांच्यासह आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दोन दिवसांपूर्वी या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्यात आले. त्यासाठीची माहिती विद्यार्थ्यांना एनटीएकडून देण्यात आली होती. देशभरातून नीटसाठी 15 लाख 97 हजार 433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर 3 हजार 842 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेला राज्यातून 2 लाख 28 हजार 914 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 615 परीक्षा केंद्रावर घेतली जात आहे.