अकोला - आकोट तालुक्यातील कुटासा येथे गुप्तधनाच्या लालसेपोटी अज्ञात व्यक्तीने जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतांमध्ये पिकांची चोरी होऊ नये म्हणून भिती घालण्याच्या उद्देशाने हा जादूटोणा केल्याचीही चर्चा गावात आहे.
कुटासातील शिवारातील रस्त्यांवर काहींनी जमिनीवर हळद-कुंकू, लाल कपडा हे एका फडक्यात बांधून जमिनीत गाडलेले दिसले. हा प्रकार लक्षात येताच गावकर्यांनी पोलीस पाटीलांना याबाबत माहिती दिली. त्या जागेवर ख़ड्डा खोदला असता लाल कपडा, हळद कुंकू, लिंबू एका मडक्यावर ठेवलेले निर्दशनास आले. तर अधिक खोदले असता मडक्यात मुंगुसासारखा मृत प्राणी आढळून आला.
गुप्तधनाच्या हाव्यासापोटी प्रकार असल्याची चर्चा-
हा प्रकार गुप्तधनाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याची वार्ता क्षणात गावात वार्यासारखी पसरली. तर काही ठिकाणी हा प्रकार भिती निर्माण करण्यासाठी मुद्दाम केला असल्याची चर्चा आहे. एकंदरीतच या प्रकाराने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.